श्रावणात त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी देवस्थानचा महत्वपूर्ण निर्णय !
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग देवस्थान ट्रस्टने भाविकांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दर्शनासाठी मंदिर दररोज पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत तर श्रावण सोमवारी पहाटे ४ ते रात्री ९ पर्यंत खुले असणार आहे.

अधिक मास समाप्तीनंतर श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून नाशिकजवळील त्र्यंबकेश्वरला भाविकांचा मोठा उत्साह दरवर्षी पाहायला मिळतो. राज्यभरातून लाखो भाविकांची उपस्थिती श्रावण सोमवारसह श्रावण महिन्यात पाहायला मिळते.

श्रावण महिन्यात महादेवाला पूजले जाते. त्यामुळे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरात या महिन्यात भाविकांची मोठी गर्दी असते. यंदा तर अधिक मास होता. त्या मासातही प्रचंड गर्दीने त्र्यंबकेश्वर फुलून गेल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर श्रावण महिन्याला सुरवात झाल्याने या गर्दीत वाढ होणार आहे. म्हणूनच मंदिर प्रशासनाने दर्शनाची वेळ वाढवून घेत भाविकांसाठी अनेक निर्णय घेतले आहेत. त्यानुसार त्र्यंबकेश्वर मंदिर दररोज पहाटे 5 ते रात्री ९ वाजेपर्यंत तर श्रावण सोमवारी पहाटे ४ ते रात्री ९ पर्यंत दर्शनासाठी खुले राहणार आहे. यावर्षी एकूण ४ श्रावणी सोमवार आहेत.

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आद्य ज्योतिर्लिंग असल्याने देश-विदेशातून लाखो भाविक येत असतात. त्यामुळे नेहमी गजबजल्याचे दिसून येते. भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर विश्वस्त समिती, पोलिसांच्या वतीने खास नियोजन करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांना वातानुकूलित दर्शनबारीची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे हजारो भाविक दर्शनासाठी उभे राहू शकतील. ज्येष्ठांना या दर्शनरांगेत बसण्याची व्यवस्था असून पिण्याचे पाणी तसेच प्राथमिक आरोग्य कक्ष तयार करण्यात आला आहे. स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्र्यंबकेश्वरच्या गावकऱ्यांना उत्तर महाद्वारातून प्रवेश दिला जाईल. सकाळी मंदिर उघडल्यापासून साडेदहा वाजेपर्यंत आणि सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत दर्शन घेता येईल. स्थानिक रहिवासी असल्याचा पुरावा मात्र सोबत ठेवावा लागेल. देणगी दर्शन रांग उत्तर दरवाजातून सुरू होईल, असे विश्वस्त मंडळाने स्पष्ट केले आहे.

