पत्नीच्या खून प्रकरणातून पतीची निर्दोष मुक्तता

जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल…

प्रतिनिधी —

पत्नीच्या खुनाच्या आरोपातून पतीची जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. अकोले तालुक्यातील गाजलेल्या या खटल्याचा बुधवारी न्यायालयाने निर्णय दिला. बाळासाहेब विठ्ठल आडांगळे (रा. उंचखडक, ता. अकोले) असे न्यायालयाने मुक्तता केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पती-पत्नीमध्ये झालेल्या किरकोळ भांडणाच्या कारणावरून बाळासाहेब आडांगळे यांनी पत्नी कल्पना हिला ‘तू उद्धट आहे, काही एक ऐकत नाही, काल तू माझ्या तावडीतून वाचली, आज तुला सोडणार नाही’, असे म्हणत तिच्या डोक्यात, डाव्या खांद्यावर कुऱ्हाडीने व चाकूने मारून तिला गंभीर जखमी केले होते. पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरून अकोले पोलीस ठाण्यात बाळासाहेब आडांगळे यांच्या विरोधात ११ सप्टेंबर २०१७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आडांगळे यांच्या जखमी पत्नीवर मुंबईच्या जेजे रुग्णालयात उपचार सुरू होते. १४ सप्टेंबर २०१७ रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तत्पूर्वी तिने दिलेल्या मृत्यूपूर्व जबाबांमध्ये पतीने मारहाण केल्याचे म्हटले होते. त्यामुळे पोलिसांनी आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. अकोले पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी याप्रकरणी तपास करत संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोपी विरोधात आरोप पत्र दाखल केले होते.

न्यायाधीश एस. डी. कुलकर्णी यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज सुरू होते. विधी सहाय्य केंद्रामार्फत आरोपी बाळासाहेब आडांगळे यांचे वकीलपत्र ॲड. गौरव मालपाणी यांच्याकडे देण्यात आले होते. मालपाणी यांना या खटल्यामध्ये चंद्रशेखर संगमकर यांनी सहाय्य केले. खटल्या दरम्यान झालेल्या सुनावणी वेळी आरोपी आडांगळे गुन्हा घडला त्यावेळी घटनास्थळी उपस्थित नव्हता. असा बचाव करत खटल्यातील साक्षीदारांच्या साक्षीमध्येही असलेली तफावत ॲड. मालपाणी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.

सरकार पक्षाला आरोपी विरोधात आरोप सिद्ध करता आले नाही. त्यामुळे न्यायाधीश एस. डी. कुलकर्णी यांनी आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!