रस्ता लूट करणाऱ्या दरोडेखोरांची टोळी घारगाव पोलिसांनी पकडली !

आरोपींना तीन मार्चपर्यंत पोलीस कोठडी

एअर गन, कोयता व इतर हत्यारांसह मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी —

पिस्तुलाचा धाक दाखवून घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यावर लूट करणारी दरोडेखोरांची टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले असून अटक केलेल्या चोरट्यांना ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे.

घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकांना अडवून बंदुकीचा धाक दाखवून रस्त्यावर लूटमार करणाऱ्या या आंतरराज्य दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांच्या पथकाने सापळा रचून पकडले आहे.

त्याचबरोबर चोरीस गेलेला मुद्देमाल देखील जप्त केला असून दरोडेखोरांकडून विविध हत्यारांसह २ लाख ८१ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

परशुराम आप्पा मोरे (वय २२ वर्षे, रा. रेणुका नगर, ता. शेवगाव, जिल्हा अहमदनगर, मूळ राहणार आंबेडकर चौक, मुरुड, लातूर), सचिन दगडू कासार (वय वर्ष २१, रा. निवडुंगे, ता. पाथर्डी, जिल्हा अहमदनगर), सलमान अहमद पठाण (वय १९ वर्षे, रा. मराठी शाळेजवळ, ता. पाथर्डी, जिल्हा अहमदनगर), अनुराग मुकुंद असलकर वय २० वर्षे, रा. कसबा पेठ, ता.पाथर्डी, जिल्हा अहमदनगर) आणि एका अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वरील चौघांना अटक केली आहे व त्यांना ३ मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

नाशिक पुणे हायवेच्या लेन वरून नाशिक कडे जाणाऱ्या किशोर बाळकृष्ण राऊत (वय वर्ष ३७, रा. प्रथमेश अपार्टमेंट, समर्थ नगर, वडाळा, पाथर्डी रोड, नाशिक) हे मोटर सायकल वरून जात असताना दिनांक २५ फेब्रुवारीच्या रात्री दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास वरील आरोपींनी त्यांची मोटरसायकल अडवून बोटा गावच्या शिवारात पिस्तुलचा धाक दाखवत त्यांना मारहाण करून त्यांचा हात फ्रॅक्चर करून जखमी केले होते. तसेच त्यांच्या ताब्यातील पाकीट मधील पैसे, एटीएम कार्ड, वाहनाचे रजिस्ट्रेशन स्मार्ट कार्ड, पॅन कार्ड, रोख रुपये सहाशे आणि सीबीझेड मोटरसायकल नंबर एम.एच. १५ सी. डब्ल्यू. ३६८२ बळजबरीने चोरून नेले होते.

याबाबत घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. सदर अज्ञात आरोपींचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, पोलीस हवालदार के. एम. देशमुख, पोलीस शिपाई गणेश लोंढे, तसेच संतोष राजेंद्र खैरे, पोलीस नाईक किशोर सुधीर लाड, हरिश्चंद्र बांडे, अनिल भांगरे महिला पोलीस वर्षा शिंदे असे शोध घेत असताना. गुप्त माहिती दाराकडून मिळालेल्या माहितीवरून सापळा रसून पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यामध्ये सदर आरोपींकडून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला असून एक एअर गन, लोखंडी धारदार कोयता, दोन मोटार सायकल, आठ मोबाईल, वेगवेगळ्या बँकेचे एटीएम कार्ड, गाडीचे रजिस्ट्रेशन स्मार्ट कार्ड, पॅन कार्ड असा मुद्देमाल जप्त केला आहे. वरील आरोपींवर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. यातील आरोपी परशुराम आप्पा मोरे याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये दहा गुन्हे दाखल आहेत. तर या आरोपींनी संगणमताने घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीसह पाथर्डी, सुपा, खेड, चाकण, शिक्रापूर परिसरात गुन्हे, दरोडे, घरफोडी, चोऱ्या केल्या असल्याचे उघडकीस आले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!