ग्रामपंचायत मतमोजणीच्या ठिकाणी हे नियम पाळावेच लागतील — तहसीलदार संगमनेर
प्रतिनिधी —
ग्रामपंचायत मतमोजणीसाठी येणाऱ्या उमेदवारांच्या प्रतिनिधींना, उमेदवारांना मतदान केंद्रात काही नियम पाळावे लागणार आहेत. यापैकी खालील सहा नियम तर पाळावेच लागतील असे आदेश आज तहसीलदार अमोल निकम यांनी दिले आहेत.

संगमनेर तालुक्यामधील मतदान झालेल्या ३७ ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी सकाळी ठिक १० वा. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल (बॅडमिंटन हॉल), संगमनेर येथे करणेत येणार आहे. सदर मतमोजणीसाठी उपस्थित राहणारे उमेदवार मतमोजणी प्रतिनिधी यांच्याकरिता सुचना खालीलप्रमाणे आहेत.

१) सदर ठिकाणी उपलब्ध जागेनुसार कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून मतमोजणी प्रक्रिया शांततामय वातावरणात होण्यासाठी २० टेबलवर ९ फेऱ्या मध्ये मतमोजणी पुर्ण करण्यात येईल. मतमोजणीच्या फेऱ्या या सोबत जोडल्या परिशिष्ट क नुसार असतील.

२) प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रिया १० वाजता सुरु होणार असली तरी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणेचे दृष्टिने व अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी मतमोजणी प्रतिनिधी यांनी सोबत जोडलेल्या परिशिष्ट क मधील वेळापत्रकानुसार आपल्या ग्रामपंचायतीच्या फेरीच्या अर्ध्या तासापुर्वी इदगाह मैदानाच्या बाजुने, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल (बॅडमिंटन हॉल), संगमनेर येथिल मतमोजणी कक्षात प्रवेश करावा.

३) सरपंच पदाची निवडणुक लढविणाऱ्या उमेदवाराला प्रत्येक टेबलसाठी एक प्रतिनिधी नेमता येईल तसेच सदस्य पदाची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारास स्वतः किंवा त्याचा मतमोजणी प्रतिनिधी यापैकी कोणीही एक व्यक्ती यांनी त्यांच्या ग्रामपंचायतीसमोर दर्शविलेल्या वेळी विहीत ओळखपत्रासह उपस्थित रहावे व उपस्थित पोलिस प्रशासनास सदर ओळखपत्र दाखवूनच आत यावे.

४) मतमोजणीनंतर सर्व प्रतिनिधी यांनी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल (बॅडमिंटन हॉल), संगमनेर येथिल मेनगेटच्या डाव्या बाजूने (तहसिल कार्यालयाच्या बाजूने) बाहेर पडावयाचे आहे.

५) मतमोजणी कक्षामध्ये येताना कोणीही दुरध्वनी (मोबाईल) व गुलाल आदी आणू नये. त्याचप्रमाणे सर्व प्रक्रिया सी.सी.टी.व्ही. चे निगराणी खाली होणार असल्याने मतमोजणी प्रक्रिये दरम्यान शिस्त पाळावी.

६) उमेदवार / मतमोजणी प्रतिनिधी यांनी आपले ओळखपत्र संबंधित ग्रामपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून प्राप्त करुन घ्यावे. सदर ओळखपत्राचे आधारे मतमोजणीचे ठिकाणी प्रवेश दिला जाईल याची नोंद घ्यावी.

तरी सर्व उमेदवार व मतमोजणी प्रतिनिधी यांनी सुचनांचे पालन करावे. असे आवाहन तहसिलदार संगमनेर तथा राज्य निवडणुक आयोगाचे प्राधिकृत अधिकारी यांनी केले आहे.

