नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व चर्च, प्रार्थनागृहांना संरक्षण देण्याचे आश्वासन ! 

सहकार्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार – अनिल भोसले

प्रतिनिधी —

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व चर्च, प्रार्थनागृहांना संरक्षण देण्याचे आश्वासन दिले असून पोलीस आयुक्तांना फोनवरून सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशी माहिती महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती समाजाचे अध्यक्ष अनिल भोसले यांनी दिली.

ख्रिस्ती बांधवांचा ख्रिसमस अर्थात नाताळ सण पुढील आठवड्यात येऊ घातला आहे. ख्रिस्ती समाज बांधवांचा वर्षातील हा मोठा सण असल्याने सर्वत्र सणाची लगबग सुरु आहे. या सणामध्ये धार्मिक विधींना अनन्यसाधारण महत्त्व असते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेच्या विश्वस्त श्रीमती जेनेट डिसुझा यांच्या नेतृत्वाखाली ख्रिस्ती सामाजिक संघटना व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा बंगल्यावर भेट घेतली. या भेटीत नाताळ व नववर्षाच्या मध्यरात्री चर्चमधील उपासना दरम्यान सुरक्षा उपायांच्या संदर्भात चर्चा झाली.

चर्चेतील मुद्यांस अनुलक्षून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व चर्च, प्रार्थनागृहांना संरक्षण देण्याचे आश्वासन दिले असून पोलीस आयुक्तांना फोनवरून सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या चर्चेमध्ये श्रीमती जेनेट डिसूझा, डँरिल डिसुझा यांसह महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या मध्यरात्री सेवा दरम्यान सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक चर्च अर्थात प्रार्थना मंदिराच्या वतीने तुमच्या स्थानिक पोलिस स्टेशनला वेळ आणि ख्रिसमस व नवीन वर्षाचा धार्मिक विधी व कार्यक्रमाच्या वेळी सुरक्षा आणि सहकार्याच्या व्यवस्थेबद्दल आधीच पूर्ण माहिती द्यावी, असे आवाहन परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भोसले, उपाध्यक्ष अँड. सिरील दारा, सरचिटणीस प्रफुल्ल असुरलेकर यांनी केले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!