संगमनेर रोटरीची ‘वंचितांची दिवाळी’ भाऊबीज भेट !
प्रतिनिधी —
घरापासून दूर असलेल्या कामगार, शेतमजूर, विद्यार्थी यांची दिवाळी आनंदात जावे यासाठी रोटरी क्लबच्या वतीने भाऊबीजेचा आदल्या दिवशी दिवाळी किराणा साहित्य वाटप करून सर्वांचा आनंद द्विगुणीत केला जातो यावर्षीही वंचितांचे दिवाळी हा प्रकल्प पार पडला

सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहून दिवाळी वंचित कुटुंबीयांसाठी तसेच तळागाळातील समाजासाठी मदत करणाऱ्या रोटरी क्लब, संगमनेरतर्फे गेली पाच वर्षांपासून सुरू असलेला वंचितांची दिवाळी हा प्रकल्प याही वर्षी भाऊबीजेच्या आदल्या दिवशी २५ ऑक्टोबर रोजी पिंपरणे येथे उत्साहात राबविण्यात आला.

आपल्या घरापासून दूर आलेल्या ऊस तोडणी कामगार भगिनींची दिवाळी आनंदात जावी, आपला भाऊ न भेटल्याची जाणीव त्यांना होऊ नये हा या प्रकल्पामागचा मुख्य उद्देश असल्याचे अध्यक्ष हृषिकेश मोंढे व सेक्रेटरी आनंद हासे यांनी सांगितले.

यावर्षी मालेगाव येथून संगमनेर येथे आलेल्या कुटुंबीयांची निवड या प्रकल्पासाठी करण्यात आली. तालुक्यातील पिंपरणे येथे सुमारे १२० कुटुंबीयांनी आपली वस्ती वसविली आहे. या वस्त्यांवरील ११० महिला भगिनींना दिवाळी साठीचे किराणा साहित्य व साडी अशी भेट याप्रसंगी देण्यात आली.

यावेळी पदाधिकाऱ्यांचे औक्षण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी सुनील घुले यांनी या प्रकल्पाची संकल्पना समजावून सांगितली. या प्रकल्पासाठी प्रकल्प प्रमुख म्हणून रमेश दिवटे, सोनू राजपाल, ओंकार सोमाणी, अमोल मुळे यांनी काम पाहिले.

प्रकल्प यशस्वीतेसाठी सर्व रोटरी क्लब सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी रोटरी सदस्य, ऊसतोड कामगारांचे कुटुंबिय व गावकरी उपस्थित होते.

