समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारा भारतीय डाक विभाग !
जागतिक टपाल दिन विशेष
अमोल गवांदे, संगमनेर
९ ऑक्टोबर, जागतिक टपाल दिन… टोकियोत १९६९ मध्ये आयोजित केल्या गेलेल्या युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेसच्या संमेलनात जागतिक टपाल दिनाची घोषणा करण्यात आली होती. १८७४ मध्ये युनिव्हर्सल पोस्टल युनियन (UPU) निर्मितीच्या वर्धापन दिनानिमित्त स्विर्झलंडची राजधानी बर्न या शहरात २२ देशांनी एकत्र येऊन करारावर सही केली होती. १ जुलै १८७६
ला भारत ‘युनिवर्सल पोस्टल युनियन’ चा सदस्य होणारा पहिला आशियाई देश ठरला. या वर्षी युनिव्हर्सल पोस्टल युनियनने “पोस्ट टू प्लानेट” या थीम वर जागतिक टपाल दिनाचे आयोजन केले आहे. संपूर्ण भारतभर हा आठवडा “राष्ट्रीय टपाल सप्ताह” म्हणून साजरा केला जातो. या संपूर्ण आठवड्यात पोस्टाच्या विविध योजना, भूमिका सामाजिक व आर्थिक विकासातील योगदान याविषयी जनसामान्यांमध्ये जागरूकता करण्यात येते.

१८५४ साली स्थापन झाल्यानंतर डाक विभागाने दळणवळण क्षेत्रात प्रगती साधली. डाक विभाग इतिहासाची सभ्यता, संस्कृती अन अर्थव्यवस्थाच्या विभिन्न अंगाना स्पर्श करते. ग्रामीण भागात दऱ्या खोऱ्यात टपाल पोहोचवण्यासोबत परदेशातही खुशालीचे संदेश देण्याचे काम डाक विभाग १६७ वर्षापासून इमानेइतबारे पार पाडत आहे. भारतीयांच्या सुख दुःख चा साक्षीदार जो पुर्वेपासुन पश्चिमेपर्यंत व उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत संपूर्ण भारताच्या दळणवळण व्यवस्थेला एका दोरीत बांधण्याचे काम डाक विभाग करतो. काळाच्या ओघात बदल झाले.पत्रांची जागा मेसेज व इमेल ने घेतली.तार केव्हाच बंद पडली. मनीओर्डर ची जागा फोन पे किंवा गूगल पे ने घेतली. असे असले तरी डाक विभागाचे महत्व कमी झाले नाही.डाक विभागानेही काळाच्या बदलानुसार स्वतःमध्ये बदल करत जनतेच्या सेवेची नाळ जोडून ठेवली आहे.

जगातील सर्वात मोठे अन विशाल पोस्टल नेटवर्क अशी याची ख्याती आहे. भारतभर १५६४३४ पोस्ट ऑफिस ज्यापैकी १४१०५५ पोस्ट ऑफिसेस ग्रामीण भागात आहेत. स्वातंत्र्याच्या वेळी २३३४४ पोस्ट ऑफिस होती, जी प्रामुख्याने शहरी भागात होती. स्वातंत्र्यानंतर सातत्याने सातपट वाढ नोंदवत प्रामुख्याने ग्रामीण भागाच्या विस्तारावर लक्ष केंद्रित केले आहे. सरासरी एक पोस्ट ऑफिस २१.३६ चौ.किमी ला व ८७१३ लोकांना सेवा देते.या विभागाबद्दल कुतूहलाच्या व विक्रमी बाबी आहेत.हिमालयीन पर्वतरांगात हिक्कीम या ठिकाणी समुद्रसपाटीपासून १४५६७ फुटावर जगातील सर्वात उंचावर पोस्ट ऑफिस आहे ज्याठिकाणी मोबाईल व इंटरनेट कनेक्टीविटी नाहीये. काश्मीरमधील सुंदर अशा दाल लेक मधील शिकार्यामध्ये जगातील एकमेव फ्लोटिंग (तरंगते) पोस्ट ऑफिस आहे. अंटार्क्टिका खंडातील दक्षिण गंगोत्री ज्या ठिकाणी भारताचा वैज्ञानिक बेस आहे या ठिकाणी भारताबाहेरील एकमेव पोस्ट ऑफिस आहे.

कालाय तस्मे नमः याप्रमाणे पोस्टाने वेळोवेळी स्वीकारलेल्या बदलांमुळे आजही पोस्ट ऑफिस जनतेशी नाळ जुळवून आहे. प्रामुख्याने एप्रिल २००८ साली आलेला प्रोजेक्ट arrow अंतर्गत असलेल्या लुक अँड फील ने पोस्ट ऑफिसच्या इमारती देखण्या करण्यावर प्रामुख्याने भर दिला गेला. जुनाट अन मळकटलेले दिसणारे पोस्ट ऑफिसेस सुंदर झाली जी काळाची गरज होती. २०१२ साली आलेला आयटी मोडर्नाझेशन प्रोजेक्ट ने मेल, बँकिंग, वित्तीय अन विमा सेवा पूर्णपणे संगणकीकृत केल्या. जुनाट लेजर अन बाईंडरची जागा कॉम्पुटर ने घेतली.

कोअर बँकिंग सेवेमुळे खऱ्या अर्थाने पोस्ट ऑफिसेस एकमेकास जोडली गेली ज्यामुळे ग्राहकास भारतातील कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये बँकिंग व्यवहार करणे शक्य झाले. ग्रामीण पोस्ट ऑफिसेस साठी राबवलेला दर्पण प्रोजेक्ट ने खेडेगावातील पोस्ट ऑफिसेस सुद्धा डिजिटल झाली. ट्रॅक अँड ट्रेस सेवेने आपले टपाल कोठे आहे याचा मागोवा घेणे अगदी सोपे झाले आहे.भारत सरकारने ग्रामीण भागात बँकिंग सेवा मिळण्यासाठी व आर्थिक समावेशन होण्यासाठी पोस्टाला बँकिंग चा परवाना २०१८ मध्ये दिला. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून सरकारच्या अनेक जनकल्याण योजनांचे पैसे जनतेस आपल्या गावातच मिळणे सुलभ झाले आहे. पत्रे वाटणारा पोस्टमन हा चालती फिरती बँक झालेला आहे.पोस्टमनच्या हाती आलेल्या स्मार्ट फोनद्वारे लोकांची स्मार्ट कामे करणारा हा पोस्टमन खराखुरा स्मार्ट झाला आहे.

कोरोनाकाळात केलेल्या जनसेवेची दाखल अनेक माध्यमांनी घेतली. इतिहासात जेव्हा पहिल्यांदा रेल्वे थांबली. देश-विदेशांतर्गत विमान सेवा थांबली, राज्य-आंतरराज्य बससेवा थांबली तेव्हा “डाक सेवा..जन सेवा” या खात्याच्या ब्रीद वाक्या प्रमाणे केवळ मेट्रो शहरांमध्ये असेलली पोस्टाची लालपरी औषधी साहित्य घेऊन ग्रामीण भागात दाखल झाली.कडक लॉक डाऊन मध्ये जेव्हा बाहेर पडणेही शक्य नव्हते तेव्हा याच पोस्टमनने आधार इनेबल्ड पेमेंट सुविधे द्वारे जनतेला त्यांच्या बँक खात्यातील पैसे घरपोहोच दिली.

डाक सेवेसोबतच पोस्ट ऑफिस बचत खाते, सुकन्या समृद्धी खाते, आवर्ती जमा, सावधी जमा, राष्ट्रीय बचत पत्र, किसान विकास पत्र, भविष्य निर्वाह निधी खाते, जेष्ठ नागरिक योजना, मासिक प्राप्ती योजना, अटल पेन्शन योजना असे विविध खाते आपण पोस्टात उघडू शकतो.इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या सहाय्याने सर्व प्रकारची बिल पेमेंट, आरटीजीअस, NEFT, UPI, फंड ट्रान्स्फर या गोष्टी घरबसल्या मोबाईल बँकिंग च्या माध्यमातून अगदी सोप्या झाल्या आहे. या सोबतच कॉमन सर्विस सेंटर,आधार केंद्र,पासपोर्ट केंद्रे हि जनसेवेशी निगडीत सुविधा निवडक टपाल कार्यालयांत सुरु केलेल्या आहेत.यात कोणतीच शंका नाही कि,भारतीय डाक विभागाच्या व्यापक नेटवर्क,विश्वास,सहज संवाद यावर तमाम कल्याणकारी योजना अगदी समाजाच्या शेवट्च्या घटकापर्यंत पोहोच केल्या जाऊ शकतात.भारतीय डाक विभागाचा एक घटक असल्याचा आम्हा सर्व पोस्ट कर्मचार्यांना सार्थ अभिमान आहे.जागतिक टपाल दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा…
अमोल गवांदे, विपणन अधिकारी
भारतीय डाक विभाग, संगमनेर मुख्य डाकघर
मो क्र- ९४०४६९६६६३
