माझी वसुंधरा अभियानात अकोले नगरपंचायतीला विभागस्तरावरील प्रथम पुरस्कार प्रदान
प्रतिनिधी —
‘माझी वसुंधरा अभियान २.०’ मधील नगरपंचायत गटामधील नाशिक विभाग स्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार अकोले नगरपंचायतीने पटकाविला आहे. अकोले नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी व मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली. माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेचा सन्मान सोहळा आज पर्यावरण दिनाचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे संपन्न झाला.

पुरस्कार स्वीकारण्यासाठी नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी, आरोग्य समिती सभापती शरद नवले, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रतिभा मनकर, बांधकाम समिती सभापती वैष्णवी धुमाळ, नगरसेवक विजय पवार, मुख्याधिकारी विक्रम जगदाळे, आरोग्य विभागप्रमुख राहुल मंडलिक, आण्णासाहेब वाकचौरे, अक्षय कर्णिक, समाधान गांगुर्डे आदी उपस्थित होते.

“मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड आणि संवर्धन, हरितपट्टा विकास, पर्यावरण पूरक जीवनशैलीचा अंगीकार करण्यास केलेले जनप्रबोधन यातील योगदानासाठी अकोले नगरपंचायतीस गौरवण्यात आले. यासाठी नगरपंचायतीचे कर्मचारी, सफाई कर्मचारी तसेच परिसरातील स्वयंसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांचेच योगदान ही महत्त्वाचं आहे. या सर्व घटकांच्या मेहनतीचं फलित म्हणजे आजचा हा सन्मान आहे.” अशी प्रतिक्रिया मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांनी दिली आहे.
या सन्मानाबद्दल अकोले शहरातील नागरिकांकडून नगरपंचायतचे कौतुक होत आहे.
