देशाच्या कामगार चळवळीचे आधारवड साथी सायन्ना एनगंदूल यांचे निधन
प्रतिनिधी —
विडी कामगारांचे आधारवड, कामगार चळवळीचे अध्वर्यू , थोर समाजवादी नेते साथी सायन्ना एनगंदूल यांचे वृद्धापकाळाने आज पहाटे निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ९० वर्षांचे होते.
विडी कामगारांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे. सर्वहारा वर्गासाठी, असंघटित कामगारांसाठी कायमच रस्त्यावर उतरून लढा देणारे साथी सायन्ना संपूर्ण राज्याला परिचित होते. विविध आंदोलने, मोर्चे, सत्याग्रह, जेलभरो,चळवळी राज्य पातळीवर नव्हे तर देश पातळीवर त्यांनी गाजवल्या आहेत.
माजी पंतप्रधान चंद्रशेखर, मधु दंडवते, कॉम्रेड गोविंद पानसरे, अण्णा हजारे, ना.ग.गोरे, एस एम जोशी, साथी किशोर पवार, मृणाल गोरे, भाई वैद्य अशा अनेक चळवळीतल्या विविध नेत्यांचे ते स्नेही व सहकारी होते.
महिला, विडी कामगार, गोरगरीब कामगार या सर्वांसाठी आंदोलनातून सायन्ना यांनी हरप्रकारे मदत केली. एकदम साधी रहाणी. साधेपणाने आपले आयुष्य जगणारे साथी सायन्ना नेहमीच सायकल आणि पायी प्रवास करत होते. खादी हा त्यांचा आयुष्यभराचा पेहराव होता. स्वतःचे काम स्वतः करायचे. हा त्यांचा शिरस्ता होता तो त्यांनी आयुष्यभर पाळला. अतिशय निष्कलंक चारित्र्य वान जीवन त्यांनी फक्त चळवळीसाठी समर्पित केले होते.
आज पहाटे त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र चंद्रकांत एनगंदूल यांच्यासह सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. आज सायंकाळी पाच वाजता अमरधाम, संगमनेर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
