संगमनेरची मानाची होलमराजा काठी जेजुरीकडे मार्गस्थ

आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते महाआरती

संगमनेर / प्रतिनिधी 

मल्हार मार्तंड की जय… खंडोबा महाराज की जय… येळकोट येळकोट जय मल्हार…” अशा जयघोषात दरवर्षीप्रमाणे यंदाही संगमनेर येथील मानाची होलमराजा काठी वाजत-गाजत, भंडाऱ्याची मुक्त उधळण करत जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ झाली. यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते मल्हार मार्तंडाची महाआरती करण्यात आली.

संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून जेजुरी येथील मल्हार मार्तंड खंडोबा देवस्थान ओळखले जाते. या देवस्थानचा माघ पौर्णिमेनिमित्त यात्रोत्सव साजरा केला जातो. यावर्षी हा यात्रोत्सव १ व २ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर संगमनेर येथील मानाची होलमराजा काठी मंगळवारी( दि.२७) सकाळी १० वाजता शहरातील तेली खुंट येथील होलमराजा मंदिरात खंडोबा भक्तांच्या हस्ते महाआरती करून शहरातून वाजत-गाजत मिरवणुकीने निघाली.

ही मिरवणूक सय्यद बाबा चौक, मेन रोड मार्गे माळीवाडा येथील मारुती मंदिर तसेच साळीवाडा येथील खंडोबा मंदिरात महाआरतीसाठी थांबली. त्यानंतर ही काठी खंडोबा गल्लीतील मल्हार मार्तंडाचे भक्त मदन पारख यांच्या निवासस्थानी काही काळ विसावली. याठिकाणी आमदार खताळ यांच्या हस्ते भक्ति भावाने मल्हार मार्तंड खंडोबा देवाची महाआरती करण्यात आली. महा आरतीनंतर उपस्थित सर्व खंडोबा भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर मल्हार मार्तंडाचा जयजय कार आणि भंडाऱ्याची मुक्त उधळण करत ही मानाची होलमराजा काठी भक्तिभावात जेजुरीच्या दिशेने रवाना झाली. या मिरवणुकीत संगमनेर येथील मल्हार मार्तंड खंडोबा होलम राजा देवस्थान, मल्हार मार्तंड होलम भक्त सार्वजनिक काटकर मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने खंडोबा भक्त सहभागी झाले होते.संपूर्ण परिसर भक्तिरसातन्हाऊन गेला होता.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!