रघुवीर खेडकर यांना ‘पद्मश्री’ जाहीर – आमदार सत्यजीत तांबे यांनी जिल्हा नियोजन बैठकीत मांडला अभिनंदनाचा ठराव
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क
अखिल भारतीय तमाशा परिषदेचे ज्येष्ठ मार्गदर्शक, संगमनेरचे भूषण आणि ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना भारत सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या ‘पद्मश्री’ पुरस्कारामुळे तमाशा या लोककलेला राष्ट्रीय पातळीवर मानाचा मुकुट लाभला आहे. या ऐतिहासिक सन्मानाबद्दल आमदार सत्यजीत तांबे यांनी आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत रघुवीर खेडकर यांचा अभिनंदनाचा ठराव मांडला जो सर्व सदस्यांनी एकमताने मंजूर केला.

स्वर्गीय कांताबाई सातारकर यांचा समृद्ध कलावारसा समर्थपणे पुढे नेत रघुवीर खेडकर यांनी तमाशा या लोककलेला नवी ओळख, नवे परिमाण आणि नवी उंची मिळवून दिली. सोंगाड्याच्या हजरजबाबी भूमिकेपासून वगनाट्यातील दमदार अभिनय तसेच पारंपरिक लावणी नृत्य आणि अष्टपैलू सादरीकरणातून त्यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
लोककलेचा प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी आयुष्यभर केलेले योगदान अतुलनीय असून, तमाशा क्षेत्रात पहिल्यांदाच ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळण्याचा मान संगमनेरच्या या महान कलावंताला लाभणे ही संपूर्ण संगमनेर तालुक्यासाठी अभिमानाची व गौरवाची बाब असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी आपल्या ठरावात नमूद केले.

“सौ शहरी एक संगमनेरी” या वाक्याला साजेसा अभिमानाचा क्षण आज पुन्हा अनुभवायला मिळतो आहे. आमचे संगमनेरचे रत्न आज पुन्हा एकदा संपूर्ण देशात गाजले आहेत. ‘सोंगाड्या’ भूमिकेतून महाराष्ट्राच्या लोककलेवर अधिराज्य गाजवत त्यांनी तमाशा तुकाराम खेडकर यांचा वारसा पुढे नेला. “वारसाने संधी मिळते, परंतु कर्तृत्व हे सिद्ध करावंच लागतं”. रघुवीर खेडकरांना वारसाने संधी मिळाली आणि त्यांनी आपल्या कर्तृत्वाने ती योग्य ठरवून दाखवली हेच आजच्या या गौरवप्रसंगी प्रकर्षाने जाणवतं आणि ते पाहून मनापासून आनंद होतो.
– आमदार सत्यजीत तांबे
