संगमनेरात पुन्हा घरफोडी ; पुन्हा मंगळसूत्र चोरले !

शहर पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरट्यांचा धुमाकूळ 

 संगमनेर | प्रतिनिधी

संगमनेर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून घरफोडी आणि मंगळसूत्र चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. शहर पोलिसांच्या नाकावर टिचून चोरट्यांचा हा धुमाकूळ सुरू असल्याचे आता बोलले जात आहे. पोलिसांचा कुठलाही धाक चोरट्यांना उरला नसून दिवसाआड चोऱ्यांचे सत्र सुरू आहे.

शहरात सर्व प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत. अवैध धंद्यांना अभय असतानाच सर्वसामान्य नागरिकांच्या कष्टाच्या कामावर डल्ला मारण्याचे काम चोरट्यांकडून सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकांना मात्र पोलिसांकडून कुठलेही अवयव नाही. शहरात घरफोड्या मंगळसूत्र चोरीचे प्रकार अद्यापही थांबले नाहीत आणि पोलिसांनाही यात चोरटे सापडत नाहीत. असा प्रकार संगमनेरात सध्या दिसून येत आहे.

मोटार सायकल वरून येणाऱ्या चोरट्यांना तर कोणाचीही भीती उरलेली नाही. दिवसा संध्याकाळी रात्री अगदी तिन्ही वेळांना या चोऱ्या होत आहेत. संगमनेर शहरातील बीएड कॉलेज रोड इदगाह मैदानाच्या गेट जवळ एका महिलेच्या गळ्यातील सुमारे दोन तोळ्याचे मंगळसूत्र चोरून नेण्याची घटना घडली. अनिता संतोष पितळे (राहणार सह्याद्री कॉलेजच्या पाठीमागे संगमनेर) यांनी यासंदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी या त्यांच्या किराणा दुकानाकडे जात असताना पाठीमागून मोटरसायकलवर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र जोराचा हिसका देऊन ओढून नेले. संगमनेर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाकडे घटनेचा तपास करीत आहेत.

तर शहरातील एका कॉम्प्लेक्स मधील दुसऱ्या मजल्यावर फ्लॅट नंबर चार मध्ये नवीन नगर रोडवर घरफोडी करण्यात आली असून या घरपोडी मधून देखील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेण्यात आली आहे. या संदर्भात सोनवणे यांनी फिर्याद दिली असून पोलीस हेड कॉन्स्टेबल सातपुते हे पुढील तपास करीत आहेत.

फिर्यादी सोनवणे आणि त्यांची पत्नी कामानिमित्त घराबाहेर दरवाजाला कुलूप लावून गेले असता घराच्या दाराची कडी कोयंडा तोडून घरातून दागिने आणि रोख रक्कम चोरून नेण्यात आल्याची फिर्याद देण्यात आली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!