संगमनेर – अकोले तालुक्यातील सिंचन प्रकल्पाच्या कामांना गती द्यावी – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क दि.10 :-

संगमनेर व अकोले तालुक्यातील सिंचन प्रकल्पाच्या कामांना गती द्यावी. या दोन्ही तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढावे यासाठी सिंचन प्रकल्प व योजनांच्या कामांचे सर्वेक्षण करून याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अकोले मतदारसंघातील जलसंपदा विभागातील विकास कामे आणि संगमनेर तालुक्यातील साकुर व पठार भागातील जलनियोजन संदर्भात मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार अमोल खताळ, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता तथा सह सचिव संजीव टाटू आदी उपस्थित होते.

मंत्री विखे – पाटील म्हणाले, आमदार डॉ. किरण लहामटे आणि आमदार अमोल खताळ यांनी सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्याबाबत ज्या योजना, प्रकल्पाची कामे सुचवली आहेत त्या योजना व कामांचा जलसंपदा विभागाने अभ्यास करावा. ज्या योजनाच्या कामांचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे त्याचे सर्वेक्षण करून आराखडा तयार करावा. अकोले व संगमनेर मधील सिंचन प्रकल्पांची साठवण क्षमता, प्रत्यक्ष होत असलेलला पाणी साठा याबाबतही अधिकाऱ्यांनी अहवाल सादर करावा.

या बैठकीत आमदार डॉ. किरण लहामटे आणि आमदार अमोल खताळ यांनी उपस्थित केलेले विविध मुद्दे व कामांचा आढावा घेण्यात आला. त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे व कामे प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांनी या कामाचे सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कालबद्ध पद्धतीने कामे पूर्ण करावीत, अशा सूचनाही जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांनी यावेळी दिल्या.

बैठकीत मेळावणे बंधारा, बिताका पाणी वळण बंधारा, भंडारदरा, शिळवंडी, बलठण, पाडोशी बुडित बंधारे बांधणे, निमगाव भोजापूर धरण पाण्याचे योग्य नियोजन, साकुर पठार भागातील पाणी प्रश्न आणि निळवंडे डावा व उजवा कालवा यासह अन्य विषयांचाही आढावा घेण्यात आला.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!