सागर वाईन्सचे सर्व कागदपत्र बनावट — उत्पादन शुल्क विभाग 

अंतिम कारवाईचा चेंडू जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात !

संगमनेर प्रतिनिधी दिनांक 22

संगमनेर शहरात वादग्रस्त ठरलेल्या सागर वाईस या देशी दारू दुकानाची कागदपत्रे बनावट असल्याचा अहवाल संगमनेरच्या उत्पादन शुल्क विभागाने वरिष्ठांकडे दिला आहे. हे वादग्रस्त दुकान सध्या चर्चेत असून बेकायदेशीर बांधकाम तसेच दारू दुकानाची बोगस कागदपत्रे यामुळे चांगलेच गाजले आहे. शहरातील सामाजिक कार्यकर्त्या बनोबी शेख यांनी हे अवैध दारू दुकान हटविण्यासाठी आंदोलन केले आहे. उपोषण आणि विविध प्रकारे आंदोलन केल्यानंतर या दारू दुकानाची चौकशी लागली. आता कारवाई अंतिम टप्प्यात आली आहे. अंतिम निर्णयाचा चेंडू आता जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या कोर्टामध्ये आहे.

संगमनेर शहरात अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी दिल्ली नाक्यावर अगदी रस्त्यालगत सागर वाईन्स हे देशी दारूचे दुकान आहे. ही जागा नगरपालिकेची आरक्षित जागा आहे. जागा नगरपालिकेची, आरक्षण असताना देखील त्या ठिकाणी अवैधरित्या बांधकाम करून देशी दारूचे दुकान चालविले जात आहे. नवले यांच्या नावावर या देशी दारू दुकानाचा परवाना असून त्यांनी या ठिकाणी दुकान सुरू करताना बनावट कागदपत्रे तयार करून हे देशी दारू दुकान सुरू केले असल्याचे उघड झाले आहे. तसा अहवालच उत्पादन शुल्क विभाग संगमनेर यांनी वरिष्ठांना कळविल्याने आता जिल्हाधिकारी याबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

संगमनेर येथील सामाजिक कार्यकर्त्या बानोबी शेख यांनी या संदर्भात सुरुवातीला आवाज उठवला. त्यांनी उपोषणाचा इशारा दिला, उपोषणही सुरू केले र्व स्तरातून समाजाच्या, राजकीय नेत्यांच्या, पुढार्‍यांच्या समर्थनातून त्यांच्या उपोषणाला बळ मिळाले. त्यामुळे प्रशासनाला कारवाईचे पाऊल उचलावे लागले. जिल्हाधिकारी पातळीवर या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. उत्पादन शुल्क विभाग अहिल्यानगर तसेच संगमनेर उत्पादन शुल्क विभाग या सर्व स्तरावर दुकानाच्या कारभाराची चौकशी करण्यात येत आहे. अगदी सखोल पद्धतीने चौकशी केल्यानंतर बऱ्याच प्रकारचे बनावट कागदपत्रे तयार करून ही अवैध इमारत बांधून देशी दारूचे दुकान सुरू करण्यात आल्याचे समोर आले. सर्व प्रकारच्या चौकशी आणि सोनावणे नंतर आता अंतिम निर्णय होणेबाकी आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!