संगमनेर महविद्यालयाची ‘कौशल्य क्रांती’ ! विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय संधींचे नवे दालन !
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 26
शिक्षण पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमनेरमध्ये शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयाने आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. संस्थेत नव्याने साकारलेल्या ‘श्री रामनारायण श्रीकिसन बूब कौशल्य भवना’ च्या भव्य इमारतीचे नुकतेच दिमाखदार उद्घाटन संपन्न झाले. या आधुनिक कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे आणि रोजगाराचे नवे दालन खुले झाले आहे. क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी लि. पुणेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक बुब यांच्या हस्ते आणि क्लीन फिनोकेम लि. पुणेचे कार्यकारी संचालक कृष्णकुमार बूब यांच्या प्रमुख उपस्थितीत या कौशल्य विकास भवनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीरजी तांबे, पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे, शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी, शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश क्षत्रिय, खजिनदार राजकुमार गांधी, सचिव डॉ. अनिल राठी, जनरल सेक्रेटरी सीए. नारायण कलंत्री, बांधकाम समितीचे अध्यक्ष संतोष करवा, जसपाल सीताराम डंग आणि प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांच्यासह संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते.

संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी यांनी त्यांच्या प्रास्ताविकात कौशल्य विकास भवन हे संस्थेच्या इतिहासातील एक सोनेरी पान असल्याचे म्हटले. या भवनातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान मिळणार नाही, तर त्यांच्या कौशल्यांचा विकास साधला जाईल. येथे तयार होणारे विद्यार्थी हार्ड वेअर आणि डेअरी सायन्ससारख्या आधुनिक अभ्यासक्रमांबरोबरच नाविन्यपूर्ण प्रयोगशाळांमध्ये ज्ञानार्जन करतील. हॉस्पिटॅलिटी आणि मॅनेजमेंटचे अचूक प्रशिक्षण घेऊन हे विद्यार्थी केवळ देशातच नव्हे, तर डेन्मार्क आणि स्वीडनसारख्या प्रगत राष्ट्रांमध्येही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यापूर्वीच संस्थेचे २० विद्यार्थी परदेशात उच्च पगाराच्या नोकऱ्या करत आहेत, हे संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीचे उत्तम उदाहरण आहे. या कौशल्य भवनाची निर्मिती उदार दात्यांच्या मदतीने झाली आहे, हे विशेष उल्लेखनीय आहे असे ते म्हणाले.

बाळासाहेब थोरात यांनी आपल्या ओघवत्या भाषणात शिक्षण प्रसारक संस्थेच्या समर्पित कार्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले. “संगमनेर महाविद्यालयाचा विकास मी अगदी जवळून पाहिला आहे. या संस्थेने नेहमीच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न केले आहेत आणि ही नवीन वास्तू त्या प्रयत्नांचेच प्रतीक आहे. येथे शिक्षण घेणारी तरुण पिढी निश्चितच आत्मनिर्भर बनेल,” असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
शिक्षण प्रसारक संस्थेचे जनरल सेक्रेटरी सीए. नारायण कलंत्री यांनी नूतन वास्तूची माहिती देतांना सांगितले की, ही चार मजली इमारत आधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज आहे. तळमजल्यावर परीक्षा विभाग, पहिल्या मजल्यावर प्राणिशास्त्र विभाग, दुसऱ्या मजल्यावर बी.व्होक आणि हॉस्पिटलिटी मॅनेजमेंट विभाग, तिसऱ्या मजल्यावर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोग्रामिंग आणि चौथ्या मजल्यावर एमबीएच्या अद्ययावत वर्गांची सोय आहे. प्रत्येक मजला दहा हजार चौरस फुटांचा असून, यात आधुनिक फर्निचरसह प्रशासकीय कार्यालयाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या भव्य इमारतीसाठी दात्यांनी उदार हस्ते मदत केली आहे, त्या सर्व दान दात्यांचा मूर्ती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे कार्यकारणी सदस्य सचिन पल्लोड व डॉ. जितेंद्र पाटील यांनी तर संस्थेचे सचिव डॉ. अनिल राठी यांनी आभार मानले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शिक्षण प्रसारक संस्थेचे सर्व सदस्य, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
