लोकशाहीच्या सुदृढतेसाठी मतदानाचे कर्तव्य प्रत्येकाने बजवावे -‌ अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी

संगमनेर येथे लोकशाही संवादाचे आयोजन 

प्रतिनिधी —

मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. देश विकासासाठी व लोकशाहीच्या सुदृढतेसाठी मतदानाचे कर्तव्य प्रत्येकाने बजवावे, असे आवाहन राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी यांनी केले.

संगमनेर उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्यावतीने संगमनेर महाविद्यालयात आयोजित ‘लोकशाही संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, संगमनेर उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, उपविभागीय पोलीस अधिकारी हरिष खेडकर, तहसीलदार धीरज मांजरे, संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य अरूण गायकवाड आदी उपस्थित होते.

कुलकर्णी म्हणाले की, संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. देशाला प्रगतीच्या वाटेवर पुढे नेता यावे यासाठी जनतेने निवडलेले प्रतिनिधी सक्षम असणे आवश्यक आहे, आणि त्यासाठी मतदारांनी निर्भयपणे तसेच विचारपूर्वक मतदान करणे तेवढेच आवश्यक आहे. यादृष्टीने मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी निवडणूक आयोगाच्यावतीने स्विप कार्यक्रम राबविला जातो. तसेच नवमतदारांमध्ये निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती व्हावी याकरिता विविध उपक्रम राबविले जात असल्याची माहिती कुलकर्णी यांनी यावेळी दिली.

ते पुढे म्हणाले, मुक्त आणि निर्भय वातावरणात मतदारांनी मतदान करायला हवे. निवडणुकांच्या वेळी कोणत्याही प्रलोभनाला किंवा दबावाला बळी न पडता आपल्या मताधिकाराचा उपयोग करायला हवा.

मतदानाच्या वेळी मतदार यादीत नावे नसल्याने मतदानाचा अधिकार न बजावता आल्याचेही बऱ्याचदा निदर्शनास येते. वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यावर युवक-युवतींना मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी प्रोत्साहित करायला हवे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

मतदार म्हणून आपल्याला असलेल्या अधिकारांबाबत जागरूक राहिल्यास देशातील लोकशाही व्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. मतदार नोंदणी प्रक्रियेत सहभागी होऊन मतदानासाठी आपण सज्ज असणे आवश्यक आहे. असे मत कुलकर्णी यांनी मतदारांशी संवाद साधताना व्यक्त केले.

जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, नवमतदारांना मतदार नोंदणीसाठी नेमका अर्ज कोठे करावा याची माहिती प्रशासनाकडून वेळोवेळी उपलब्ध करून दिली जात आहे. तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेतही यासंदर्भात वेळोवेळी नोंदणीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध अभियानात मतदार नोंदणीची माहिती दिली जाते.

सुदृढ आणि सशक्त लोकशाहीसाठी देशातील प्रत्येक सुजाण नागरिकाने आपले नाव नोंदवून ते मतदान यादीत आहे, याची खात्री करावी. कारण मतदान यादीत नाव असेल तरच मतदान प्रक्रियेत सहभाग घेऊन योग्य उमेदवाराला मत देऊनच लोकशाही बळकट करता येईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

दिव्यांग मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे तसेच त्यांच्या नोंदणी प्रक्रियेत सहजता यावी. यासाठी जिल्हा प्रशासनाने राबविलेले उपक्रम व घेतलेल्या निर्णयांविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी माहिती दिली.

प्राचार्य अरूण गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित महिला, नागरिक, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थी, पत्रकार, वकिल अशा समाजातील सर्व घटकांशी लोकशाही प्रक्रियेविषयी कुलकर्णी व सालीमठ यांनी संवाद साधला. निवडणूकीत सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रसारित होणाऱ्या फेक न्यूज तसेच ईव्हीएम यंत्राविषयी नागरिकांच्या शंकांचे यावेळी निरसन करण्यात आले.

प्रास्ताविकात प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी निवडणूक विषयक जनजागृतीसाठी संगमनेर उपविभागाने राबविलेल्या उपक्रमाविषयी माहिती दिली.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!