खासदार निलेश लंकेच्या मनी विखे कुटुंबीयांच्या विषयी गोडवा !

संगमनेर टाईम न्युज नेटवर्क —

लोकसभा निवडणुकीच्या वेळी जोरदार टीकास्र सोडून एकमेकांना घायाळ करणारे लंके – विखे यांनी अहमदनगर दक्षिणची निवडणूक गाजवली होती. निलेश लंके निवडून आले. निवडणुकीनंतर झालं गेलं सोडून द्यायचं आणि एकमेका विषयी मनात कटूता न ठेवता प्रेमाने राहायचं असा पवित्र घेत निलेश लंके यांच्या मनात विखे कुटिंबियांविषयी असलेला गोडवा त्यांनी व्यक्त केला असून ‘विखे कुटुंबीयांचा मला अभिमान आहे, पद्मश्री विखे पाटलांनी आशिया खंडातील पहिला साखर कारखाना सुरू केला असल्याचे मी अभिमानाने सांगतो’ असा विखे कुटुंबीयां विषयीचा गोडवा गात लंके यांनी राजकीय वैर निवडणुकीपुरतेच असल्याचे दाखवून दिले आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत अहमदनगर दक्षिण मतदारसंघामध्ये भाजपाचे सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते निलेश लंके यांच्यामध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळाली. निवडणूक प्रचारात लंके आणि सुजय विखे यांनी एकमेकांवर बरेच आरोप केले होते.

खासदार निलेश लंके यांनी विखे कुटुंबियाबाबत अभिमान असल्याचे सांगतानाच आशीर्वाद घेण्यासाठी लवकरच राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या विधानाची आता एकच चर्चा होत आहे.

एवढेच नव्हे तर विखे कुटुंबिय हे जिल्ह्यात मोठं कुटुंब आहे. त्यांचं सहकार क्षेत्रात मोठं नाव आहे. निवडणुकीचा निकाल आता लागला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात आता बोलणं योग्य नाही. झालं गेलं सोडून द्यायचं. प्रचारात माझ्याकडून एखादा शब्द घसरला असेल किंवा त्यांचा माझ्यावर घसरला असेल. मग आता तेच मनावर घेऊन बसायचं का असाही सवाल लंके यांनी उपस्थित केला असून राजकारणातील कटू गोष्टींना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी खासदार निलेश लंके आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यात राजकीय वक्तव्यांच्या जोरदार चकमकी झडत होत्या. तसेच खासदार लंके यांचे किंग मेकर माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी या निवडणुकीत लंकेसाठी सक्रिय सहभाग घेतल्याने महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार थोरात यांचीही राजकीय जुगलबंदी पाहण्यास मिळाली. अगदी टोकांच्या टीका एकमेकांवर करण्यात आल्या. आता खासदार लंके यांनी विखे कुटुंबीयांविषयी गोडवा गात निवडणूक काळातील कटू आठवणी सोडून देण्याचा पवित्र घेतल्याने आमदार बाळासाहेब थोरात यांची यावर काय प्रतिक्रिया असेल हा देखील चर्चेचा विषय ठरला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!