‘वा रे वा विखे-पाटील’ – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुरखा फाडला !
लाचखोर अतिरिक्त महसूल आयुक्त प्रकरणी विखेंची शिफारस वादाच्या भोवऱ्यात
प्रतिनिधी —
लाचखोर पुणे महसूल विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड यांची बदली न करता त्यांना एक वर्षाची मुदतवाढ द्यावी, असे शिफारसपत्र भाजपचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी १ जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले होते. हे पत्र ट्विट करत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ‘वा रे वा विखे-पाटील’, असे म्हणत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. दानवे यांच्या ट्विटने भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठिशी घालणाऱ्या भाजपचा बुरखा फाडला गेला आहे.

डॉ. रामोड यांच्यावर सीबीआयने छापा टाकल्यानंतर त्यांच्याकडे ६ कोटी ६४ लाख रुपयांची रोकड मिळाली आहे. डॉ. रामोड यांना पुण्यातच अतिरिक्त विभागीय आयुक्त या पदावर एक वर्षाची मुदतवाढ द्यावी, यासाठी १ जूनला पत्र दिले आणि डॉ. रामोड यांना १० जून रोजी लाच घेताना सीबीआयने रंगेहाथ पकडले. या प्रकरणात आता महसूलमंत्री विखे- पाटील यांनी डॉ. रामोड यांना मुदतवाढीसाठी दिलेली शिफारस वादात सापडली आहे.

विखे-पाटील यांचे हे शिफारसपत्र जाहीर करून अंबादास दानवे यांनी ‘वा रे वा विखे-पाटील’ या शीर्षकाखाली ट्विट केले असून, त्यामध्ये पुणे येथे आयएएस अधिकारी डॉ. अनिल रामोड हा आठ लाख रुपये लाच घेतल्यामुळे सीबीआयने अटक केल्यावर सध्या कारागृहात आहे. परंतु या प्रकरणात महसूलमंत्री विखे-पाटील यांचे नाव समोर आले आहे.

रामोड यांची बदली पुण्यातून करू नये, यासाठी विखे- पाटील यांनी मुख्यमंत्री यांना १ जूनला शिफारसपत्र दिले होते. त्याला एक वर्ष मुदतवाढ देण्यात यावी, असे विखे-पाटील यांनी शिफारसीमध्ये म्हटल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे या प्रकरणात आता नवी कोणती अपडेट समोर येत आहे, याकडे लक्ष लागले आहे.

