गौण खनिज चोरी आणि वाळू तस्करी बाबत संगमनेरच्या महसूल अधिकाऱ्यांची चुप्पी !

महसूल मंत्री बदलले तरी अधिकाऱ्यांना कोणताही फरक पडलेला नाही ; जनतेचा अपेक्षाभंग !

 

 

वारंवार तक्रारी करून देखील महसूल अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक कारवाई करण्यास टाळाटाळ करणे म्हणजे गौण खनिज आणि वाळू तस्करीला पाठीशी घालणे किंवा तस्करांशी, वाळू माफियांशी संगणमत करणे असाच प्रकार असल्याचे बोलले जाते.

 

 

प्रतिनिधी —

जुने महसूल मंत्री बदलून नवे महसूल मंत्री नगर जिल्ह्याला मिळाले असले तरी संगमनेर शहर आणि तालुक्यातील गौण खनिज चोरी आणि वाळू तस्करीला आळा बसला नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

आज संगमनेरच्या नागरिकांनी वाळू तस्करांनी चोरलेली वाळू पुन्हा नदीत टाकली असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले आहे. हे बहुदा पहिल्यांदाच घडले असावे. यापूर्वी नदीतून वाळू चोरली जात असल्याचे पाहण्यास मिळत होते आज नदीत पुन्हा वाळू टाकण्यात आली असल्याचे पाहण्यास मिळाले.

राधाकृष्ण विखे पाटील यांना पालकमंत्री पद आणि महसूल खाते मिळाल्यानंतर त्यांनी वाळू तस्कर आणि गौण खनिजांच्या तस्करांवर कारवाई सुरू केली होती. तरीही संगमनेर मधे त्याचा काही फरक पडलेला दिसत नाही. संगमनेरचा महसूल विभागच गौण खनिज तस्कर आणि वाळू तस्करांशी संधान साधून असल्याने येथील तस्करीला आळा बसलेला नसल्याचे आरोप नागरिक करतात.

संगमनेर मध्ये निळवंडे कालव्या मधून निघालेले गौण खनिज तसेच आजूबाजूच्या जागांमधून गौण खनिज, मुरूम, डबर, माती दगड याची सर्रासपणे चोरी होत असून संगमनेरचे तहसीलदार, प्रांत अधिकारी यांच्याकडे तक्रार देऊन देखील कारवाई झालेली नाही.

विशेष म्हणजे या संदर्भातील तक्रारी महसूल मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील करण्यात आलेल्या आहेत. तरीही संगमनेरचे अधिकारी त्यावर कुठलीही कारवाई करत नाहीत ही आश्चर्याची बाब आहे.

 

सुमारे १३ दिवसांपूर्वी निळवंडे धरणाच्या कालव्यातून मोठ्या प्रमाणावर गौण खनिज चोरी झाल्याची तक्रार तेथील नागरिकांनी तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्याकडे केली होती. आजपर्यंत त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. याबाबत तहसीलदारांकडे अनेक वेळा विचारणा करून त्यांनी कारवाई केली की नाही या संदर्भात चुप्पी साधण्याचे काम सुरू ठेवले आहे. कुठलीही प्रतिक्रिया न देणे हे चोरीला पाठीशी घालने किंवा चोरांशी संगणमत असण्यासारखे आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी देखील कारवाई करण्याचे आश्वासन दिले असताना संगमनेरच्या अधिकाऱ्यांवर त्याचा कुठलाही परिणाम होताना दिसत नाही.

आज गंगामाई घाटावर रोज सकाळी फिरायला जाणाऱ्या संगमनेरच्या नागरिकांनी वाळू तस्करी विरोधात घोषणा देत घाटाच्या पायऱ्यांवर वाळू तस्करांनी सिमेंटच्या रिकाम्या गोण्यांमध्ये भरून ठेवलेली वाळू पुन्हा नदीपात्रात टाकून दिली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी सुरू असून देखील महसूल विभागाकडून कुठलीही कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे.

यातून महसूलचे अधिकारी वाळू तस्करांना सामील असल्याचेच उघड होत आहे. नागरिकांनी महसूल प्रशासनाविरुद्ध घोषणा देत कारवाईची मागणी केली आहे. कारवाई झाली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील शहरवासीयांनी दिला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!