संगमनेर बस स्थानकाचे विकासक आर.एम. कातोरे यांना अवैध गौण खनिज प्रकरणी पावणेचार कोटी रुपयांचा दंड !
सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
गौण खनिज तस्करी हा संगमनेरच्या सुसंस्कृत राजकारणावरचा ‘काळा धब्बा’ !

संगमनेर तालुक्यातील गौण खनिज तस्करी, वाळू चोरी या संदर्भाने सातत्याने होत असलेल्या कारवाया आणि त्यातून झालेले कोट्यावधी रुपयांचे दंड अशी अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. या सर्व प्रकरणातली बहुतेक दोषी मंडळी ही माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे समर्थक आणि पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत. त्यामुळे कुठलाही राजकीय शिंतोडा नसलेल्या संगमनेरच्या सुसंस्कृत राजकारणावर जवळच्याच समर्थक पुढार्यांनी हा ‘गौण खनिजाचा ‘काळा धब्बा’ लावला असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

प्रतिनिधी —
संगमनेर शहरात बीओटी तत्त्वावरील नव्याने बांधण्यात आलेल्या बसस्थानक व व्यापारी संकुलाचे विकासक आर एम कातोरे यांना गौण खनिजाचे अवैध उत्खनन प्रकरणी संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी ३ कोटी ६६ लाख २२ हजार ८६९ रुपयांचा दंड ठोठावला आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ पाटील यांनी यासंदर्भात तक्रार दिली होती. सुमारे चार वर्ष पाठपुरावा केल्यानंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

आर एम कातोरे हे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक असून नगर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत. बसस्थानकाच्या कामाच्या वेळी ते जिप सदस्य म्हणून कार्यरत होते.

गौण खनिजाचे अवैध उत्खनन आणि त्याबाबत महसूल विभागाने उचललेली पावले यातून संगमनेर तालुक्यात गौण खनिजाची तस्करी किती मोठ्या प्रमाणावर सुरू होती हे उघड होत आहे.

याआधी सुद्धा स्टोन क्रशरच्या माध्यमातून गौण खनिज चोरी करणाऱ्या स्टोन क्रशर चालकांवर कारवाई करून त्यांना सुमारे ७६५ कोटी रुपयांचा दंड थोठवण्यात आला आहे. आता त्यानंतर संगमनेर बस स्थानकाच्या कामासाठी वापरण्यात आलेल्या गौण खजिनाचा हा कोट्यावधी रुपयाचा घोटाळा उघडकीस आला आहे.

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कारकिर्दीत संगमनेर मध्ये असे प्रकार घडल्याचे उघड झाल्याने संगमनेर सुसंस्कृत राजकारणाला कार्यकर्त्यांकडूनच हा ‘काळा धब्बा’ लागल्या असल्याची चर्चा आता नागरिकांमध्ये होत आहे.

संगमनेर चे तहसीलदार अमोल निकम यांनी यासंदर्भात हा निकाल दिला असून गौण खनिजामध्ये वाळू , मुरूम, डबर आणि क्रश सँड याचे अवैध उत्खनन, रॉयल्टी बुडविणे या आरोपाखाली हा दंड करण्यात आलेला आहे.

यामध्ये वाळू २ कोटी ३४ लाख १ हजार रुपये, मुरूम ८४ लाख ९ हजार ६५२, डबर १० लाख ४८ हजार २४४ रुपये, क्रश सँड १ कोटी ४३ लाख ८३ हजार ९७३ रुपये अशा स्वरूपाचा दंड आकारण्यात आलेला आहे.

अमोल खताळ पाटील यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा केला.या सर्व लढाईत चार वर्षांचा कालावधी गेला.आवश्यक असणारे सर्व पुरावे देखील सादर करण्यात आले होते. त्यानंतर याप्रकरणाची सुनावणी होऊन तहसीलदार यांनी कारवाई केली. विकासक कातोरे यांना झालेला दंड जोपर्यंत भरणा केला जात नाही तो पर्यंत याबाबत पाठपुरवा सुरु राहणार आहे असे अमोल खताळ पाटील यांनी सांगितले .


अमोल खताळ हा सामाजिक कार्यकर्ता नाही..
तो भाजपा चा माणूस आहे.. हे त्यानी राजकारण करणाऱ्या साठी केला जाणारा केविलवानी प्रयत्न आहे…हे सर्व त्याची प्रसिद्धी साठी चालु आहे…… हे सर्व संगमनेर चा जनतेला माहिती आहे… बेरोजगार तरुनाचं उत्तम उधारन