अकोले तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा — पद्मश्री राहीबाई पोपेरे

 

प्रतिनिधी —

अकोले तालुक्यातील आदिवासी पट्ट्यांमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने व अद्यापही पाऊस सुरू असल्याने खरिपाची सर्वच पिके धोक्यात आली आहेत. अनेक ठिकाणी पिके वाहून गेली आहेत. तर अति पाण्याने सडले आहेत. त्यामुळे आदिवासी शेतकरी हवालदील झाले आहेत. या सर्वांना शासनाकडून आश्रय मिळावा म्हणून अकोले तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी केली आहे.

अकोले तालुक्यातील आदिवासी पट्ट्यामध्ये खरीप हंगामात पेरणी केलेल्या बहुसंख्य पिकांना अतिवृष्टीचा फटका मोठ्या प्रमाणावर बसला आहे.

सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे खरिपातील पिके हातातून जाताना दिसत आहेत. शेतकरी पाण्यात वाहून गेलेली पिके डोळ्यासमोर बघतांना हवालदिल झालेला आहे.

मोठ्या कष्टाने आणि श्रमाने उभे केलेली भात, नागली, वरई तसेच इतर खरिपातील पिके अत्यंत नाजूक परिस्थितीत आहेत संपूर्ण खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व संकट शेतकऱ्यांवर उभे ठाकले आहे. भात शेती उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.आदिवासी पट्ट्यातील बहुसंख्य शेती ही पावसावर अवलंबून असते. सुरुवातीला पाऊस उशिरा आल्याने भात लागवडी उशिरापर्यंत सुरू होत्या.

त्यामुळे सुरुवातीलाच हवामान बदलाचा फटका बसलेली शेती कशीबशी कर्ज घेऊन व उसनवारी करून शेतकऱ्यांनी उभी केली होती. परंतु जुलै, ऑगस्ट व आता सप्टेंबर या तीनही महिन्यांमध्ये जोरदार पाऊस सातत्याने सुरू असून शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास जातो की काय अशी अवस्था आहे.

जोरदार पाऊस, त्यात रोग, किडींचा विविध पिकांवर वाढलेला प्रादुर्भाव याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. हीच परिस्थितीत बीजमाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांची शेती सुद्धा पावसामुळे उधवस्त झाली आहे. वर्षभर गावरान आणि अस्सल गावठी बियाण्यांची मागणी त्यांच्याकडे होत असते परंतु चालू हंगामात कुठलेही बियाणं तयार होताना दिसत नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर गावरान बियाणे निर्मितीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. पावसामध्ये काबाडकष्ट करून उभे केलेले पिके डोळ्यासमोर अतिवृष्टीने झोडपून खराब झाले आहेत. अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान बघून त्यांना अश्रू अनावर झाले. सर्व शेतकऱ्यांची वैफल्यग्रस्त परिस्थिती असून शासनाने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी असे आवाहन त्यांनी केलेले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!