वडगाव पान उपबाजार समिती लगतचा शिवार रस्ता खुला
प्रतिनिधी —
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाढलेल्या कारभारामुळे शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक व स्वतंत्र सुविधा व्हावी यासाठी वडगाव पान येथे सुरू असलेल्या उपबाजार समिती लगतचा शिवार रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांसह पोखरी हवेली सामनापूर व वडगाव पान मधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

संगमनेर बाजार समिती ही नुकत्याच आलेल्या अहवालानुसार अहमदनगर जिल्ह्यात प्रथम, नाशिक विभागात द्वितीय, तर राज्यस्तरावर चतुर्थ क्रमांकाची ठरली आहे. या बाजार समितीच्या कामाचा आवाका व दररोजचा व्यापार मोठा असून स्वतंत्र लूज कांदा मार्केट, फ्लावर मार्केट, जनावरे बाजार सुरू करण्यासाठी वडगाव पान येथे उपबाजार सुरू करण्यात आला आहे. धान्य साठवणुकीचे मोठे गोदाम उभारलेले आहेत.

या ठिकाणी ५४ गाळयांचे बांधकामही पूर्णत्वाकडे जात आहे. अत्यंत सोयीसुविधा व प्रशस्त जागा असलेल्या या उपबाजार समिती लगतचा पोखरी हवेली, वडगाव पान, समनापुर हा शिवरस्ता अनेक दिवसापासून प्रलंबित होता. तो खुला होण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून सातत्याने प्रयत्न सुरू होता. मात्र या ठिकाणी झालेले अतिक्रमण, रीतसर मोजणी अशी सर्व निकष पूर्ण करून आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा रस्ता सर्व संमतीने खुला करण्यात आला आहे.

हा रस्ता खुला झाल्यामुळे पंचक्रोशीतील सर्वच गावांना व शेतकऱ्यांना कमी अंतराचा मार्ग उपलब्ध झाला आहे. त्याचबरोबर वडगाव पान उपबाजार आणि लगतच्या शेतकऱ्यांसाठी बाहेरून जावे लागणारे तीन किलोमीटरचे अंतर ही वाचणार आहे. हा शिवरस्ता खुला करणे कामी उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, मंडळ अधिकारी जेडगुले, तलाठी सातपुते, भूमी अभिलेखचे भोईर, बाजार समिती सभापती शंकर खेमनर सर्व संचालक, सचिव सतीश गुंजाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

