संगमनेरात दोन दिवस व्हॉलीबॉल स्पर्धांचा थरार !
मालपाणी कोर्टमध्ये आयोजन; व्हॉलीबॉल प्रेमींसाठी मेजवाणी
संगमनेर | प्रतिनिधी —
मालपाणी उद्योग समूहाचे अध्वर्यू स्वर्गीय ओंकारनाथ व माधवलाल मालपाणी यांच्या स्मृती निमित्ताने आजपासून दोन दिवस संगमनेरात व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. संगमनेर शहरासह विविध ठिकाणच्या कसदार संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धांच्या माध्यमातून संगमनेरकर व्हॉलीबॉल प्रेमींना अनोखी मेजवाणी मिळणार आहे. या संधीचा प्रेक्षकांनी लाभ ध्यावा असे आवाहन द व्हॉलीबॉल क्लबच्यावतीने करण्यात आले आहे.

संगमनेरच्या सांस्कृतिक, साहित्यिक व क्रीडा विषयात मालपाणी उद्योग समूहाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यातून समूहाचे प्रमुख दिवंगत मालपाणी बंधूंच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्या अनुषंगाने आज शनिवार (ता.7) व उद्या रविवार (ता.8) दोन दिवस मालपाणी लॉन्सवरील व्हॉलीबॉल कोर्टवर एकोपक्षा एक सरस व्हॉलीबॉल संघांचा खेळ पाहण्याची संधी संगमनेरकरांना मिळणार आहे.

आज (ता.7) सायंकाळी चार वाजता आमदार अमोल खताळ, नगराध्यक्षा मैथिली तांबे, मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी, संचालक मनीष मालपाणी, प्रांताधिकारी अरुण उंडे, पोलीस उपाधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे, तहसीलदार धीरज मांजरे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे आदींच्या उपस्थितीत या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे.

रविवारी रात्री नऊ वाजता स्पर्धेचा पारितोषिक वितरण व समारोप सोहळा होईल. यावेळी आमदार सत्यजित तांबे, मालपाणी उद्योग समूहाचे संचालक डॉ.संजय मालपाणी, मनीष मालपाणी, गिरीश मालपाणी आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. संगमनेर मधील व्हॉलीबॉल प्रेमींनी या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा मनमुराद आनंद घ्यावा असे आवाहन दि व्हॉलीबॉल क्लबच्या वतीने चिंतन शाह व सूर्यकांत गुंडाळ यांच्यासह सदस्यांनी केले आहे.
