गोवंशीय कत्तल करणाऱ्या आरोपींशी आर्थिक लागेबांधे असणाऱ्या पोलीस हवालदाराचे निलंबन !
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
गोवंशीय अवैध कत्तलखान्यांवर अनेक वेळा आदेश देऊनही कारवाई न करता कर्तव्यात कसूर करून हलगर्जीपणा करीत संबंधित आरोपींशी आर्थिक हितसंबंध ठेवल्याच्या कारणावरून लोणी पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल जोसेफ सिलास साळवी यांना पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी एका आदेशान्वये निलंबित केले आहे.

ममदापुर, ता. राहाता जि. अहिल्यानगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध कत्तलखाने सुरु असल्याबाबत व सदर ठिकाणी गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या आरोपींशी लोणी पोलीस स्टेशन नेमणुकीचे पोहेकॉ / १२०३ जोसेफ सिलास साळवी यांचे आर्थीक लागेबांधे असल्याने कत्तलखान्यावर कारवाई करण्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर कत्तलखान्यावर कारवाई करत नसल्याबाबतची तक्रार पोलीस अधीक्षक कार्यालयास प्राप्त झालेली होती.

येथील अवैध कत्तलखान्याचे समुळ उच्चाटन करणे आवश्यक असतांना प्रभावी कारवाया केलेल्या नसल्याचे दिसून येत आहे. प्राप्त अर्जाच्या चौकशीमध्ये मागील १ वर्षातील ममदापुर ता. राहाता येथील प्राणीसंरक्षण अधिनियमान्वये दाखल गुन्ह्यांची माहिती घेऊन आढावा घेतला असता ममदापुर येथील प्राणी संरक्षण अधिनियमान्वये दाखल गुन्ह्यातील आरोपींच्या पोहेकॉ / १२०३ जोसेफ सिलास साळवी हे नियमीत संपर्कात असल्याचे निष्पन्न झालेले आहे. पोहेकॉ /साळवी यांनी पोलीस दलामध्ये कर्तव्यावर असतांना हलगर्जीपणाचे व शिस्तप्रिय पोलीस खात्याची प्रतिमा जनमाणसांत मलीन करणारे वर्तन केल्याचे प्रथमदर्शनी दिसुन येत असल्याने जोसेफ साळवी यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
