संगमनेरात होणार एक कोटी चे ‘नमो उद्यान’ !….

नगरपालिकेने केला ठराव मंजूर 

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

संगमनेर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत अनेक विषयांबरोबरच सुमारे एक कोटी रुपये खर्च असलेल्या ‘नमो उद्यान’ या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली असून लवकरच त्या संदर्भात निविदा प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. संगमनेर शहरात पहिल्यांदाच ‘नमो उद्यान’ साकारणार आहे.

नगराध्यक्षा डॉक्टर मैथिली तांबे त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सर्व विषयांना मंजुरी देखील देण्यात आली आहे.

याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा, महात्मा जोतिबा फुले सावित्रीबाई फुले यांचा पुतळा, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे तैलचित्र, शंभर फुटी तिरंगा ध्वज उभारणी, आणि संविधान भिंत उभारणे या सर्व कामांना अंदाजपत्रकात तरतूद करून मंजुरी देण्यात आली आहे. 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे शहरातील अतिक्रमणे हटविली जाणार असून जप्तीची कारवाई देखील करण्यात येणार आहे. तसेच अतिक्रमण निर्मूलनासाठी नव्या धोरणाला देखील मान्यता देण्यात आली आहे. तर नगर परिषदेच्या अकोले नाका जुन्या चेक नाक्याची जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी वापरण्यात येणार आहे.

नगरपरिषद हद्दीतील प्रमुख रस्त्यांवर सार्वजनिक राजकीय कार्यक्रम घेण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला असून नगर परिषदेचे सदस्य व अध्यक्ष यांना भत्ते मानधन नगर परिषदेचे वार्षिक उत्पन्न 50 कोटी रुपये होईपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात सर्व प्रकारचे बॅनर होर्डिंग झेंडे लावण्यासाठी न्यायालयाच्या निर्देशानुसार नवीन धोरण तयार करण्यात येणार आहे.

राम कृष्ण सभागृहाचा वापर फक्त कौन्सिलच्या मीटिंगसाठीच…

 नगरपरिषदेच्या आधुनिक रामकृष्ण सभागृहाचा वापर येथून पुढे फक्त नगरपालिकेच्या कौन्सिल मीटिंगसाठीच करण्यात येणार असल्याचा ठराव मंजूर करण्यात आला असून आता येथून पुढे या सभागृहात इतर कुठल्याही बैठका घेता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. इतर बैठका मिटिंग आढावा बैठक या इतर हॉलमध्ये घेण्यात याव्यात असेही सुचविण्यात आले आहे. त्यामुळे सभागृहाचा मान आणि मर्यादा राखली जाईल असे मत सदस्यांनी व्यक्त केले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!