मागासवर्गीय महामंडळाच्या योजना व प्रशिक्षण कार्यक्रम लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा — अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर

महामंडळ योजना लाभार्थी निवड समितीत 95 प्रकरणांना मान्यता

प्रतिनिधी —

अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांच्या सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय महामंडळाच्या वतीने विविध शैक्षणिक व वैयक्तिक भाग भाडवलांच्या कर्ज योजना राबविण्यात येतात. मुला-मुलींसाठी अल्पकालावधीचे प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. या योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांनी घ्यावा. यासाठी या योजनांची प्रभावीपणे प्रचार-प्रसिध्दी करण्यात यावी. अशा सूचना शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी आज येथे दिल्या.

सामाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखालील मागासवर्गीय महामंडळाच्या उत्तर अहमदनगर तालुक्यातील लाभार्थ्यांच्या निवड समितीची अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज शिर्डी येथे बैठक झाली. या बैठकीला महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक संतोष शिंदे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक पी.आर.बोराडे, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक अमोल शिंदे, राहाता आयटीआयचे एन.ए.कुलकर्णी तसेच कौशल्य विकास, समाज कल्याण व जिल्हा अग्रणी बॅकेंचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.

लाभार्थी निवड समितीने 2024-25 या वर्षासाठी प्राप्त 95 प्रकरणांना यावेळी मंजूरी दिली. यात महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे 33 प्रकरणे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे 57 प्रकरणे व संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे 5 प्रकरणे समितीपुढे सादर करण्यात आली होती. यातील 74 प्रकरणे अंतिम मान्यतेसाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ, नवी दिल्ली यांच्याकडे सादर करण्यात येणार आहेत.

मागासवर्गीय महामंडळामार्फत अनुसूचित जातींच्या लाभार्थ्यांसाठी परदेशात व देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात येते. या योजनेत परदेशातील शिक्षणसाठी 40 लाख रूपये, देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी 30 लाख रूपयांचे कर्ज देण्यात येते. महिलांना 4 टक्के व पुरूषांना 5 टक्के दराने हे कर्ज देण्यात येत असते. कर्जाची परतफेड शिक्षण पूर्ण झाल्यावर करायची असते. तसेच विविध बँका व महामंडळाच्या संयुक्त सहभागाने अनुसूचित जातीच्या व्यक्तींना 5 लाखापर्यंतचे वैयक्तीक कर्ज योजनेचा लाभ देण्यात असते. यात महामंडळाचा सहभाग 20 टक्के (50 हजार रूपयांचे अनुदान), 75 टक्के बँका व 5 टक्के लाभार्थी सहभाग असतो.

*प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन -*

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत जिल्ह्यातील तरूण-तरूणींसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये ब्युटी अँड वेलनेस या सेक्टरमध्ये ब्युटी थेरपिस्ट, हेअर ड्रेसर अँड स्टायलिस्ट, प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. इलेक्ट्रॉनिक्स या सेक्टरमध्ये कस्टमर केअर एक्झिक्यूटिव्ह, आयटी कोऑर्डिनेटर इन स्कूल, मोबाईल फोन हार्डवेअर रिपेअर टेक्निशियन, सर्विस टेक्निशियन होम अप्लायन्सेस व मल्टी स्किल टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी https://www.nbrmahapreit.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

 

 

शैक्षणिक व वैयक्तीक कर्ज योजना तसेच प्रशिक्षण अभ्यासक्रम योजनांच्या अधिक माहितीसाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादीत, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सावेडी बस स्थानक शेजारी, सावेडी, अहमदनगर (0241-2323814) येथे संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक संतोष शिंदे यांनी यावेळी केले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!