उमेदवारांच्या निवडणूक खर्चविषयक नोंदी काटेकोर ठेवा – ममता सिंग
शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक खर्च कक्षाचा आढावा
प्रतिनिधी —
निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयस्तरावर नियुक्त निवडणूक खर्च विषयक कक्षातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी विहित नमुन्यातील नोंदी तसेच उमेदवारांनी दिलेल्या खर्चाच्या माहितीच्या नोंदींची पडताळणी करावी आणि नोंदवह्या काटेकोरपणे अद्यावत ठेवाव्यात, अशा सूचना शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी खर्च निरीक्षक म्हणून नियुक्त भारतीय महसूल सेवेतील ममता सिंग यांनी आज येथे दिल्या.

शिर्डी लोकसभा मतदार संघातील नेवासा, श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर व अकोले या विधानसभा मतदारसंघात कार्यरत असलेले सर्व सहायक खर्च निरीक्षक व लेखापथक यांच्या कामकाजाचा श्रीमती सिंग यांनी प्रत्यक्ष तालुकास्तरावर जाऊन आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी संगमनेरचे प्रांतधिकारी शैलेश हिंगे, श्रीरामपूरचे प्रांतधिकारी किरण सावंत, अकोले तहसीलदार सिध्दार्थ मोरे, कोपरगाव तहसीलदार संदीपकुमार भोसले, नेवासा तहसीलदार संजय बिरादार तसेच सहायक खर्च निरीक्षक व खर्च तपासणी लेखापथकातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक खर्च सनियंत्रण यावरील अनुदेशांचा सारसंग्रह मधील लेख्यांची तपासणी या तरतूदीनुसार उमेदवाराने ठेवलेल्या दैंनदिन खर्च विषयक लेख्यांची तपासणी करण्यात येत असते. त्याअनुषंगाने श्रीमती सिंग यांनी निवडणूक सहायक खर्च निरीक्षक व लेखापथकांची बैठक घेऊन विविध निर्देश दिले.

निवडणूक खर्चाची नोंद योग्य पध्दतीने घेवून प्रत्येक नोंदी अद्यावत ठेवाव्या, बँकांकडून प्राप्त झालेल्या तपशीलाची माहिती संकलित करावी, विविध भरारी पथके सातत्याने कार्यान्वीत ठेवून प्रत्येक बाबीची बारकाईने तपासणी करावी, अशा सूचना सिंग यांनी यावेळी दिल्या.
