शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरूवात

पहिल्या दिवशी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचे प्रमाण निरंक

१८ उमेदवारांनी ३१ अर्ज घेतले

प्रतिनिधी —

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत ३८ शिर्डी (अनुसूचित जाती) लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात सोमवार, दिनांक १३ मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी उमेदवाराकडून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया आज, गुरुवार दिनांक १८ एप्रिल पासून सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने नामनिर्देशन पत्र अर्ज दाखल केला नाही. पहिल्या दिवशी १८ उमेदवारांनी ३१ अर्ज घेतले.

गुरूवारी, १८ एप्रिल २०२४ रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाली. तसेच याच दिवसापासून २५ एप्रिल २०२४ पर्यंत ११ ते ३ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी, ३८ शिर्डी (अ.जा) लोकसभा मतदारसंघ यांचे कार्यालय, १ ला मजला, राहाता तालुका प्रशासकीय इमारत, राहाता येथे नामनिर्देशन पत्र नाममात्र शुल्कात दिले जात आहेत.

नामनिर्देशन पत्र सादर करतेवेळी अनामत रक्कम जमा करावी लागणार आहे. ही रक्कम अनुसूचित जाती तथा जमातीच्या उमेदवारासाठी रूपये १२,५०० /- असून सामान्य वर्गातील उमेदवारासाठी रूपये २५००० इतकी अनामत रक्कम आहे. अनामत रक्कम जमा करून नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यापुढे शपथ घेतील. नामनिर्देशन पत्राची छाननी दिनांक २६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेपासून सुरू होईल. नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम तारीख २९ एप्रिल रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत आहे.

नामनिर्देशन अर्जात नमूद केलेल्या पक्षानुसार चिन्ह वाटप केले जाईल. त्यासह जे उमेदवार अपक्ष उभे होतील त्यांनाही स्वतंत्र चिन्ह दिले जाईल. अपक्ष उमेदवारांसाठी दहा सूचक असणे आवश्यक आहे. २९ एप्रिल रोजी तीन वाजेपर्यंत निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल.

उमेदवारास त्यांचे नामनिर्देशन हे निवडणूक आयोगाच्या “सुविधा” या वेब पोर्टलवर ही उपलब्ध आहे. याद्वारे देखील ऑनलाइन पद्धतीने नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील. अशा प्रकारे सादर केलेल्या ऑनलाईन अर्जाची एक प्रत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे येऊन प्रत्यक्षरीत्या सादर करावी लागणार आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!