शहरातील बांधकामांना शिस्त लावण्याची गरज — आमदार सत्यजित तांबे
संगमनेर नगरपालिकेच्या विषय समित्यांची निवड…
प्रशासनाची मनमानी थांबेना…
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
संगमनेर नगरपालिकेच्या विषय समित्यांची आणि सभापतींची निवडणूक आज नगरपालिकेच्या रामकृष्ण सभागृहात पार पडली.
बांधकाम – किशोर पवार, पाणीपुरवठा – मुजीब पठाण, आरोग्य – किशोर टोकसे, महिला व बालकल्याण – सरोजना पगडाल, शिक्षण – डॉ. अनुराधा सातपुते, महिला व बालकल्याण उपसभापती – प्राची काशीद, नियोजन समिती – नूर मोहम्मद शेख (उपनगराध्यक्ष) यांच्या सभापती पदी निवडी झाल्या असून स्थायी समितीच्या सदस्य पदी नगरसेवक दिलीप पुंड, विश्वास मुर्तडक आणि डॉक्टर दानिश शहानवाज यांची निवड झाली असून या समितीच्या अध्यक्षपदी नगराध्यक्ष डॉक्टर मैथिली तांबे या पदसिद्ध अध्यक्ष आहेत.

आज सकाळी 11 वाजता पालिकेच्या रामकृष्ण सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार धीरज मांजरे यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी पार पडल्या. निवड जाहीर झाल्यानंतर आमदार सत्यजित तांबे यांनी सर्व सभापतींचे अभिनंदन आणि सत्कार केले व त्यांना योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन केले.
शहरातील बांधकामांना शिस्त लावण्याची गरज — आमदार तांबे
सभापतींची निवड झाल्यानंतर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, संगमनेर शहराच्या विकासासाठी विषय समित्यांवर भक्कम काम करणारे सभापती सुरुवातीपासूनच निवडण्यात आले आहेत. शहरातील नगरपालिकेची, खासगी, ठेकेदारांची व इतर जी बांधकामे सुरू आहेत या सर्वच बांधकामांना शिस्त लावण्याची गरज असून बांधकाम सभापतींनी याकडे लक्ष देऊन सर्व काम शिस्तीत आणावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शहराची स्वच्छता आणि आरोग्य याकडेही बारकाईने लक्ष द्यावे. तसेच नगरपालिकेचे ग्रंथालय आधुनिक करावे पुस्तकांची, ग्रंथांची संख्या आणखी वाढवावी. महाराष्ट्रातील एक आदर्श ग्रंथालय म्हणून संगमनेर नगरपालिकेच्या ग्रंथालयाकडे पाहिले जावे. नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढवावी. मराठी शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देखील चांगल्या पद्धतीने दिले जावे. तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या बरोबरीने नगरपालिकेच्या शाळा कश्या शिक्षण देतील याकडे लक्ष दिले जावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच नियोजन समितीने चांगल्या प्रकारे नियोजन करून शहर विकास करावा. “ज्या विषयाला महत्त्व नाही, असे विषय मी महत्त्वाच्या ठिकाणी आणतो. ही माझी कला आहे” असेही आमदार तांबे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

सेवा समितीने जाहीर केलेल्या 2.0 व्हिजनप्रमाणे आणि जाहीरनाम्याप्रमाणे संगमनेर शहर विकासाचे काम केले जाणार असून सेवा समितीची संपूर्ण टीम यासाठी माझ्यासोबत आहे. सर्वसामान्य नागरिकांचे मूलभूत प्रश्न आणि त्याबरोबर विकास करण्याचे उद्दिष्ट समोर असून येत्या पाच वर्षात संगमनेर नगरपालिका संपूर्ण राज्यात आदर्श नगर पालिका करण्याचा प्रयत्न राहील. यासाठी शहरवासीयांनी कायम पाठीशी राहावे. त्यांनी दाखवलेला विश्वास सार्थकी लाऊ अशी प्रतिक्रिया नगराध्यक्षा डॉक्टर मैथिली तांबे यांनी दिली.

प्रशासनाची मनमानी थांबेना…
सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही बैठक दुपारी उशिरापर्यंत चालली. मात्र, निवडी जाहीर झाल्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत वृत्त प्रसिद्ध करेपर्यंत संबंधित अधिकारी किंवा पदाधिकाऱ्यांकडून अधिकृत यादी माध्यमांना देण्यात आली नाही. वारंवार मागणी करूनही “यादी तयार नाही” असे उत्तर मीटिंग लिपिकाकडून मिळाले. नंतर मात्र फोन घेण्याचे देखील टाळले जात होते. संध्याकाळचे पाच वाजले… बातमी प्रसिद्ध होईपर्यंत यादी टाईप करण्याचे काम चालू असल्याचे सांगण्यात येत होते. पालिकेतील प्रशासक राज संपून नवीन लोकप्रतिनिधी आले असले तरी, प्रशासकीय कार्यपद्धतीत अद्याप सुधारणा झालेली नसल्याची चर्चा या निमित्ताने रंगली आहे.
