नगरपालिका निवडणूक : इच्छुकांची तयारी सुरू !
संगमनेर प्रतिनिधी —
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने सर्वत्र निवडणुकांचे वातावरण आहे. दिवाळीचे सणवार झाल्यानंतर संगमनेर शहरात इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी सुरू केल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या चार वर्षांपासून नगरपालिकेवर प्रशासक असल्याने पालिकेच्या कारभारात मोठा फरक पडला आहे. असंख्य अडचणी आणि पालिकेला कोणी वाली नसल्याची भावना निर्माण झाली आहे.

संगमनेर शहरात सध्या नगरपालिका निवडणुकीचे वातावरण असून सर्वत्र निवडणुकीची चर्चा सुरू आहे. त्यामध्ये इच्छुक उमेदवार आणि कोणत्या पक्षाविरुद्ध कोणाची लढत रंगणार हा महत्त्वाचा विषय आहे.
अनेक आजी-माजी नगरसेवक निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस पक्ष माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली ढण्याची इच्छा अनेक जण व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे यावेळी युवा आमदार आणि “आय लव्ह संगमनेर” या नावीन्यपूर्ण योजनेने तरुणांच्या गळ्यातले ताईत बनलेले आमदार सत्यजित तांबे हे नगरपालिकेच्या निवडणुकीत विशेष लक्ष घालत असून नियोजन पूर्ण निवडणूक लढविण्याचा त्यांचा इरादा दिसत आहे.

तर दुसरीकडे महायुतीचे विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांची निवडणूक लढविण्याची तयारी सुरू आहे. भारतीय जनता पार्टीचे आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकारी देखील निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संगमनेर तालुकाप्रमुख अमरकतारी यांनी पक्षाच्या आदेशानुसार काम करणार असून नगरपालिका निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले.
महायुतीला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पाठबळ असल्याने यावर्षी निवडणूक संघर्षाची होणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत. नगराध्यक्ष पदासाठी दोन्ही पक्षांकडून चांगलेच तुल्यबळ उमेदवार समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे मतदारांचा विश्वासघात करून इकडे तिकडे उड्या मारणाऱ्या काही नेतेमंडळींचा चांगला वचपा काढण्यात येणार असल्याचे देखील बोलले जात आहे. त्यामुळे जो तो निवडणुकीच्या चर्चेत जरी सहभागी असला तरी शहराचा विकास शांतता व्यापार यावर जास्त भर दिला जाणार असून मतदार यावेळेस विचारपूर्वक मतदान करेल अशी अपेक्षा दोन्ही गटांकडून व्यक्त होत आहे.
